बीड Pritam Munde : बीड जिल्ह्यातील राजकारण कायमच मुंडे घराण्याच्या अवतीभोवती फिरतं. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्यांचा वारसा चालवला. प्रीतम मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्या एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या कट्टर विरोधक मानल्या जायच्या. मात्र अजित पवार भाजपासोबत आल्यानंतर त्यांच्यातील दुरावा कमी झाला आहे. याची प्रचिती नुकतीच दिसून आली.
प्रीतम मुंडे सर्वाधिक मतांनी निवडून येतील : महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे देशातून सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. बीडमध्ये महायुतीच्या पक्षांचं संमेलन झालं. त्यावेळी ते बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचं नेतृत्व करतील. त्यांच्यासोबत प्रीतम मुंडे देखील तिसऱ्यांदा खासदार बनतील. आता महायुतीची धुरा मी माझ्या खांद्यावर घेतोय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे देशात सर्वाधिक मतांनी विजयी होतील", असं धनंजय मुंडे म्हणाले.
महायुती अभेद्य आहे : "आमची महायुती अभेद्य आहे. बॅनरवर माझा फोटो नसला तरी चालेल, परंतु गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असावा. त्यांचे विचार पुढील अनेक वर्ष जिवंत राहणार आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावपातळीवरील मतभेद सोडून द्या. सर्वजण एकत्र येऊन देशाच्या हितासाठी महायुतीला साथ द्या", असं आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं.
अद्याप प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीची घोषणा नाही : भारतीय जनता पार्टीनं आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीची घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. यावर प्रीतम मुंडे यांनी सूचक वक्तव्य केलं. "मी स्वतःहून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करणार नाही. परंतु मित्र पक्षांच्या भावनेचा सन्मान ठेऊन मी उमेदवार म्हणून पुढे जात आहे", असं त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का :
- बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड अन् शुद्ध आल्यावर वेगळीच बडबड; धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका
- भाजपानं फक्त वापरुन घेण्याची भाषा करू नये; बच्चू कडूंचा इशारा
- राम मंदिर प्रतिष्ठापना हा धार्मिक कार्यक्रम की राजकीय? पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींना सवाल