बीड : छगन भुजबळांनंतर मंत्री धनंजय मुडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. फडणवीस शिंदे आणि पवार सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना रात्री बारा वाजता एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर धनंजय मुंडे यांना जीवे मारेन, अशी धमकी त्यांच्या परळीतील पंढरी निवासस्थानी असलेल्या लँडलाईन फोनवर त्या व्यक्तीने दिली. या व्यक्तीच्या विरोधामध्ये परळीत वाल्मीक कराड यांनी तक्रार दिली आहे. त्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या फोनमुळे धनंजय मुंडे समर्थकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
लँडलाईनवर फोन करून 50 लाखाची मागणी :राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे छगन भुजबळ यांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. मात्र, रात्री बारा वाजता धनंजय मुंडे यांना त्यांच्या पंढरी निवासस्थानी लँडलाईनवर फोन करून 50 लाखासाठी धमकी दिल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे बीडमध्ये येण्याअगोदरच त्यांना धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याविषयी वाल्मिक कराड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये याविषयी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.