बीड -दसरा मेळाव्यावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. काही लोक हे पराभवाचे वर्ष साजरा करण्यासाठीच बीडमध्ये येतात. मध्यंतरी कोरोनाचे संकट असताना त्यांना जनतेची आठवण झाली नाही. आम्ही मात्र लोकांसाठी रस्त्यावर उतरलो होतो, आजही जनतेसाठी सदैव उपलब्ध असतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच 2014ला माझा पराभव झाला होता, म्हणून मी काही जनतेला वाऱ्यावर सोडले नव्हते, असा टोलाही यावेळी मुंडे यांनी लगावला आहे.
केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, ऊसतोड मजूर दुसऱ्याच्या रानात जाणार नाही, यासाठी मोठी मदत करणार आहे. ऊसतोड मजूर ऊस उत्पादक शेतकरी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार आहे. बजरंग सोनवणे यांनी सात वर्षांत कारखान्यावरचे कर्ज फेडले. मात्र याच सात वर्षांमध्ये आमच्या वैद्यनाथ कारखान्यावर अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज वाढले. तरी देखील ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून आम्ही कर्ज फेडण्याची हमी घेतली, असेही ते यावेळी म्हणाले. मांजरा धरणाचा सर्वाधिक फायदा बीडच्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे त्या दृष्टीने येणाऱ्या काळात आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.