बीड- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. प्रभू वैजनाथच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक श्रावण सोमवारनिमित्त परळीमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्री बारानंतर भाविकांनी प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शांततेत व वेळेत दर्शन व्हावे यासाठी वेगवेगळ्या तीन रांगा करण्यात आल्या असल्याचे मंदिर संस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी हर हर महादेवाच्या जय घोषाने संपूर्ण परळी शहर दुमदुमले होते.
श्रावण सोमवार निमित्त बीड जिल्ह्यातील सेवालये भाविकांनी गजबजली आहेत. प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी विविध राज्यांमधून भाविकांची मंदिर परिसरात मांदियाळी पाहायला मिळाली. बेलपत्र व पुष्पहार अर्पण करून प्रभू वैजनाथाच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला. वैजनाथ मंदिराच्या परिसरात आकर्षक रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. सोमवारी पहाटे चारच्या नंतर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली. कर्नाटक आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू यासह इतर विविध राज्यांमधून भाविक प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी परळीमध्ये दाखल झाले होते. श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी हजारो भाविकांनी शंकराचे मनोभावे दर्शन घेतले.