बीड - कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन तब्बल तीन महिने बाजारपेठा बंद होत्या. आता सरकारने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. बीडमध्ये सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या आहे. मात्र, अजूनही म्हणावे तसे ग्राहक बाजारपेठेत फिरकताना दिसत नसल्याची खंत बीड शहर आणि जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पूर्वीच्या तुलनेत 40 टक्क्यांहून अधिक घसरण व्यापारात झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर बाजारपेठेची काय परिस्थिती आहे, याबाबतीत 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला आहे.
कोरोनाच्या या संकटामुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली आहे. मजुरांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वजण आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत बाजारपेठांवर याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. बाजारपेठेतील अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांवर थोडेफार ग्राहक पाहायला मिळतात. मात्र, इतर ज्या चैनीच्या वस्तू विक्री करणारी दुकाने आहेत, तिकडे मात्र ग्राहक फिरकताना दिसत नाही.
भविष्यातला अंदाज बांधणे अवघड झालंय...
उद्योग व्यवसायांना लागलेली घरघर कधी कमी होईल, हे सांगणे अवघड झाले आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे नागरिक मोकळेपणाने बाजारात फिरकत नाहीत. हा प्रकार अजुन किती दिवस चालेल, हे सांगणे अवघड आहे. मात्र, सध्या जो ग्राहक बाजारात खरेदीसाठी येत आहे. तो ग्राहक देखील मुक्तपणे खरेदी करत नाही. ज्या वस्तू आवश्यक आहेत, त्यांचीच विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 'केवळ कपडे, सोने यांसह इतर चैनीच्या वस्तूंच्या बाजारपेठेत ही परिस्थिती आहे, असे नाही. तर, फळ विक्रेत्यांचा व्यवसाय देखील मंदावला असल्याचे' असलम बागवान यांनी सांगितले.