बीड :माजलगाव येथील जय महेश साखर कारखाना या ठिकाणी कल्याण गणपती टोले (वय वर्ष 40) हे आनंदगाव येथील रहिवासी कामगार होते. टोले हे तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखाना म्हणजेच शुगर इंडस्ट्रीमध्ये कामगार म्हणून कामाला होते. कारखान्याचे काही मशिनरींची दुरुस्ती सध्या गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. नादुरुस्त मशिनरी दुरुस्त करण्यामुळे रात्रीच्या वेळेला हे काम चालू होते. मात्र रात्रीच्या दरम्यान कल्याण टोले हे बॉयलरजवळ काम करत होते, यावेळेस अचानक मशीनचा पट्टा चालू झाल्याने कल्याण ह्या मशीनच्या पट्ट्याकडे ओढले गेले. यामध्येच या पट्ट्यात अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे.
तरुणांचा अपघाती मृत्यू :ही घटना आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना कळताच मशीन बंद करण्यात आली. त्यानंतर त्यांना येथील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ फोन करून या घटनेची माहिती सांगितली. मात्र या घटनेने कारखाना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कल्याण टोले यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी आई, वडील असा परिवार आहे. ज्या गावचे कल्याण टोले आहेत, त्या गावांमध्ये याआधी देखील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसातच अपघाताने पुन्हा एक मृत्यू झाला आहे. यामुळे आनंदगावामध्ये तरुणांचा अपघाती मृत्यू ही मोठे धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. यामुळे गावात या घटनांमुळे हळहळ वेक्त केली जात आहे.