बीड-आष्टी तालुक्यातील पिंपळा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खरडगव्हाण फाटा येथे वीजेच्या धक्क्याने एका वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शरद पांडुरंग थोरवे (वय 40) असे त्या वायरमनचे नाव असून विद्युत खांबावरील लाईटची दुरुस्ती करताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे हा प्रकार घडला.
अचानक विद्युत पुरवठा सुरू
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील शरद पांडुरंग थोरवे (वय 40) हे महावितरण कंपनीच्या पिंपळा उपकेंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. पिंपळा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या पारोडी बोरोडी या मार्गाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शरद थोरवे हे मंगळवार (दि.18)चार वाजण्याच्या सुमारास खरडगव्हाण फाटा परिसरातील एका विद्युत खांबावर गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने ते तारेला चिकटले व नंतर खाली पडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.