बीड - विजयादशमीनिमित्त भगवान भक्ती गडावर मंत्री पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान, भर कार्यक्रमात मुंडे यांच्या समर्थकांनी 'पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा' म्हणत 'सीएम....सीएम'च्या घोषणा दिल्या.
हेही वाचा -शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई
पंकजा मुंडे यांनी अमित शहांच्या नेतृत्वाखाली हा सीमोल्लंघनाचा सोहळा असल्याचे सांगितले. ही गर्दी भविष्याची दिशा बदलवणारी ठरेल. राष्ट्रभक्तीच्या धाग्याने सर्वांना एकत्र बांधले आहे. भगवानबाबांनी 'जमिनी विका पण शाळा शिका' असे सांगून भविष्याचे बीजारोपण केले, म्हणून आज ही पिढी समोर बसली आहे. लोकांच्या मतांवर नाही मनांवर विराजमान होणे महत्वाच असते. दरम्यान, भाजप सरकारने उसतोड कामगार महामंडळ तयार केले आहे. यामुळे पुढच्या पाच वर्षांत कामगारांना हातात कोयता उजलण्याची गरज पडणार नाही. भगवानगडावरील स्मारक सामान्यांची चैत्यभूमी, चेतनाभूमी बनली आहे. हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम नाही, ही भक्तीची शक्ती आहे. मी अहंकाराचा गड उतरुन खाली सावरगावात आले आणि हे नाते निर्माण केले. जनतेची इच्छाशक्ती भगवान बाबांच्या कर्मभूमीतून त्यांच्या जन्मभूमीत आम्हाला घेऊन आली. माझ्या नेतृत्वाने मला कर्तृत्वाची थाप दिली. तुमचा स्वाभिमान जपण्यासाठीच मी उभी आहे. जनतेच्या मनात आहोत म्हणूनच आम्ही आहोत. या प्रदेशातील लोकांच्या प्रेमाचे उपकार फेडू शकणार नाही. अमित शाहांनी माझा आणि भगवान भक्तांचा मान वाढवला आहे. असे म्हणत, गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण करताना मला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले,' असे पंकजा यांनी म्हटले.
हेही वाचा -राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!
मेळाव्याला हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंडे, शिवसेनेचे नेते मंत्री जयदत्त क्षीरसागर, मंत्री महादेव जानकर, राधाकृष्ण विखे, राम शिंदे, खासदार डॉक्टर प्रितम मुंडे, यशश्री मुंडे, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, आमदार संगीता ठोंबरे, आमदार लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, नमिता मुंदडा, रमेश पोकळे, आबालासाहेब दोडतले, बदामराव पंडीत आदींची उपस्थिती होती.