बीड - बीड शहरातून जाणारा औरंगाबाद- सोलापूर या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याची दुरुस्ती आयआरबी कंपनीने करणे अपेक्षित आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने बीडकरांचा प्रवास खडतर होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप उबाळे व संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदन देऊन तात्काळ रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली आहे.
धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग बीड शहराच्या बाहेरून गेला आहे. या रस्त्याचे काम कंपनीने केलेले आहे. मात्र बीड शहरातून जाणारा हाच मार्ग खडतर बनला आहे. रस्त्याच्या मध्यभागात मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने दुचाकी घसरून पडण्याचे व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्त करतेय ना आयआरबी कंपनी याकडे लक्ष देतेय.