बीड - जिल्ह्यात मागील दोन दिवसांत परतीचा जोरदार पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस आणि तुरीचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याची दखल घेऊन नुकसान पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर बीड तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात करण्यासंदर्भात मी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.
बीडमध्ये परतीच्या पावसाने झोडपले; नुकसानीची दोन दिवसात पाहणी करा - आमदार संदीप क्षीरसागर - बीड परतीचा पाऊस शेती नुकसान
बीडमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिले आहेत.
आमदार क्षीरसागर यांनी सोमवारी बीड तालुक्यातील मुळूक येथील सखाराम ढास यांच्या शेतात भेट देऊन नुकसान पाहणी केली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार श्रीकांत निळे यांची उपस्थिती होती.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी तातडीने मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांची बैठक घेण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यांच्या पिकांचे पंचनामे होणे आवश्यक आहेत. याबाबत राज्य सरकारने देखील सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यातील व बीड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना यावेळी आमदार क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या.