परळी वैजनाथ (बीड) - मोहा येथील कोविड सेंटर हे आदर्श असेल असे मत मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी व्यक्त केले तर मोहा येथील कोविड सेंटरमुळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, अशी आशा परळी तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी व्यक्त केली.
कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक, आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था, मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्यालय, मोहा या ठिकाणी कोरोनाच्या सौम्य रुग्णासाठी व विलगीकरण कक्ष उपलब्ध असणारे सुसज्य असे 50 बेडचे कोविड केयर सेंटर चे उदघाटन सोमवारी करण्यात आले. सर्व कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करीत मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सम्पन्न झाला. यावेळी मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया, परळी तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, प्रतिष्ठानचे सचिव अॅड. अजय बुरांडे, सिरसाला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकसिंगे, मोहा गावचे सरपंच पांडुरंग शेप यांच्यासह मानवलोकचे व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले परळी तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र विद्यालय मोहाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे व मोहा गावातील सर्व गावकऱ्यांचे शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन होत असल्याने अभिनंदन केले. शेजुळ म्हणाले की, शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून ग्रामीण भागात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील घरे,घरामध्ये वास्तव्यास असलेले सदस्य या सर्वांचा विचार करता एखाद्या रुग्णास कोरोनाची बाधा झाल्यावर एकत्र कुटुंब पद्धती असल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा वेळी संशयित किंवा रुग्ण सहवाशीत व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवल्यास गावातील कोरोनाची साखळी तोडण्यास मोठा फायदा होऊ शकतो.