परळी -संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अदृश्य अशा शत्रू विरोधात संपूर्ण जग लढताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणारा मृत्यूदर हे गंभीर विषय आहेत. सोबतच, मोहा शिवारामध्ये सुद्धा दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत कार्यालय मोहा व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.कें.प्रा.शाळा मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. अशा प्रकारचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करणारी मोहा ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन परळी तहसीलचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विष्णुपंत देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे, सरपंच प्रतिनिधी पांडुरंग शेप, सिरसाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या योग्य नियोजनाचे कौतुक केले व सदरील विलगीकरण केंद्रामुळे मोहा गावातील रुग्ण संख्या शून्य होण्यास मदत होणार आहे. अशा कक्षांचे उद्घाटन करताना आनंद होत नसून दुःख आणि मनामध्ये खेद होत आहे. कारण समाजावर आतापर्यंत अशा महामारीची वेळ कधीही आली नव्हती आणि इथून पुढेही अशी वेळ येऊ नये, असे म्हटले.