बीड- ज्या वयोवृद्ध असलेल्या नागरिकांना मुले असूनही ते सांभाळत नाहीत अथवा मनोरुग्ण, मतिमंद असलेल्या वयोवृद्धांना आधार देण्याचे काम एक दाम्पत्य करत आहेत. त्या निराधार वयोवृद्धांना दोन वेळेचे जेवण, राहायला निवारा देण्याचे काम बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन येथील तांबे कुटुंबीय करत आहेत. 'आजोळ' परिवाराच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून हे कार्य तांबे दाम्पत्य करत आहे. 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
'आजोळ'ची निर्मिती कशी झाली?
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात राक्षस भुवन येथे सामाजिक कार्यकर्ते कर्ण एकनाथ तांबे व त्यांच्या पत्नी कोमल तांबे यांनी तीन वर्षांपूर्वी राक्षसभुवन गावात वयोवृद्धांसाठी आजोळ परिवार संस्थेची सुरुवात केली. या आजोळ परिवार सुरू करण्यामागे कारण देखील तसेच महत्त्वाचे आहे. आजोळ परिवाराच्या निर्मितीबाबत सांगताना कर्ण तांबे म्हणाले की, मी जेव्हा कोल्हापूरला डीएडचे शिक्षण घेत होतो तेव्हा मी शहरात फिरत असताना, अनेक मनोरुग्ण रस्त्याच्या कडेला भीक मागणारे वयोवृद्ध भिकारी पाहायचो. त्यांच्या वेदना मला असह्य करायच्या. त्यांना पाहून माझे मन हेलावून जायचे.
हेही वाचा -विशेष : कोविडमध्ये मोफत वैद्यकीय सल्ला देणारे साताऱ्यातील 'धन्वंतरी'
पत्नीची सर्वकाळ मदत -
माझी जडणघडण वारकरी संप्रदायात झालेली असल्याने सेवाभाव ही वृत्ती माझ्या अंगात पूर्वीपासूनच होती. ज्या वयोवृद्धांना मुले असूनही सांभाळत नाहीत अथवा मनोरुग्ण आहेत म्हणून घरच्या लोकांनी सोडून दिले आहे, अशा वंचितांचे अश्रू पुसण्यासाठी मला काही करता येईल का? याचा सतत मनामध्ये विचार करत होतो. याबाबत मी माझी पत्नी कोमल हिच्याशी सतत बोलत होतो. या सगळ्या चर्चेतून आपण वृद्धांच्यासाठी निवासी आश्रम सुरू करण्याचा विचार समोर आला. मात्र, माझ्याजवळ वयोवृद्धांसाठी आश्रम सुरू करायला पैसे नव्हते. वडिलांनी 10 वर्षांपूर्वी गावाबाहेर जागा घेतली होती. ती जागा मी वडिलांकडून आश्रम सुरू करण्यासाठी मागून घेतली. तीन वर्षांपूर्वी त्याच जागेत आजोळ परिवार संस्थेची सुरुवात केली. माझ्या या सगळ्या कामांमध्ये माझी पत्नी कोमल तांबे ही आजही सोबत आहे. परिवारात दाखल असलेल्या 15 वृद्धांची सर्व देखभाल कोमल करते, असे मोठ्या अभिमानाने कर्ण तांबे यांनी सांगितले.