बीड -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे. बळींचा आकडाही कमी व्हायला तयार नाही. दुसरीकडे सर्वसाधारण कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे चित्र आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे तसेच सुस्त कारभाराचा हा बळी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. व्हेंटीलेटर उशिरा लावले, कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध केली नाही, शिवाय खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन रुग्णालय प्रशासनाने हात झटकल्याचा प्रकार शनिवारी समोर आला.
पालसिंगण (ता. बीड) येथील ५८ वर्षीय व्यक्ती ९ सप्टेंबर रोजी श्वसनास त्रास होऊ लागल्याने शिवाय धाप लागत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. वॉर्ड क्र. ९ मध्ये त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यांचा दोनवेळा स्वॅबही तपासण्यात आला होता. मात्र, दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे त्यांना वॉर्ड क्र. २ मध्ये हलवून ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती.
प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवणे अपेक्षित होते. परंतु डॉक्टरांनी ऑक्सिजनवरच उपचार सुरु ठेवले. शुक्रवारी रात्री नातेवाईकांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे चौकशी केली, तेव्हा प्रकृतीत सुधारणा होत नाही, असे सांगून डॉक्टरांनी त्यांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या नातेवाईकांनी खासगी दवाखान्यांशीही संपर्क केला. परंतु खाट शिल्लक नसल्याने तेथे सोय होऊ शकली नाही. अखेर औरंगाबादला हलविण्याचा विचार झाला. परंतु त्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकाही जिल्हा रुग्णालय प्रशासन उपलब्ध करुन देऊ शकले नाही. अखेर सकाळी व्हेंटीलेटर लावण्यात आले. मात्र, तोपर्यंत श्वाच्छोश्वासाचा त्रास वाढत गेला आणि सकाळी साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.