आष्टी(जि.बीड)-कोरोना काळात प्रत्येक कर्मचारी आप-आपली जबाबदारी पार पाडत आहे. डॉक्टर, पोलीस यांच्या सोबत वीजवितरणचे कर्मचारी देखील कोरोना योध्याप्रमाणे रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या कामाचा प्रत्यय रविवारी रात्रीच्या सुमारास शहरवासीयांना पाहायला मिळाला.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आष्टी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी वाढत आहे. याच बरोबर शहरात सध्या दोन शासकीय आणि चार खासगी कोविड रुग्णालये सुरू आहेत. यामध्ये सुमारे तीनशे पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यात जवळपास साठ ते सत्तर बेड हे आयसीयु बेड आहेत. त्यामुळे या ठिकाणचे यंत्रणा सुरू राहण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा अत्यावश्यक आहे.
रात्रीच विद्युत पुरवठा केला पूर्ववत
रविवार (दि.2 ) रात्री दहाच्या सुमारास अचानक वादळ वारे सुटले. यात झाडांच्या फांद्या पडल्यामुळे विद्युतवाहक तारा तुटल्या आणि विद्युत पुरवठा खंडित झाला, याची माहिती मिळताच रात्रीच्या वेळीच महावितरणाची टिम घटनास्थळी दाखल झाली. तत्काळ त्यांनी झाडाच्या फांद्या हटवून वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी हे देखील पडद्यामागे काम करणारे कोरोना योद्धेच आहेत. या मध्ये शिवाजी गोरे यांचे पथकाचे खूप मोठे योगदान आहे.
आम्ही गेल्या दोन महिन्यापासून उप कार्यकारी अभियंता प्रवीण पवार, सहाय्यक अभियंता दत्तात्रय दसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू धुमाळ, चंद्रकांत करडकर, दत्ता बिबे, अशिष नवले, महेश सोले, मनोज निंबाळकर, संचित भराटे यांच्या सोबत शहरात काम करीत असल्याची माहिती वरिष्ठ तंत्रज्ञ शिवाजी गोरे यांनी दिली.