बीड - वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर 1 मार्चपासून राज्यभरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातही एकूण दहा शासकीय केंद्रांवरून सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाचे डीआयओ संजय कदम यांनी सांगितले. आधी कोरोनाच्या काळात फ्रन्ट लाईनवर काम केलेल्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली. आता वयोवृद्ध नागरिकांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात येणार आहे.
मागील वर्षभर कोरोनाची लस कधी येणार अशी चर्चा होत होती. अखेर प्रत्यक्ष सर्वसामान्य नागरिकांना लस देण्याच्या मोहिमेला 1 मार्च म्हणजेच सोमवारपासून सुरूवात केली जाणार आहे. त्या दृष्टीने बीड जिल्हा आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात एकूण 11 केंद्रांवरून लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणाच्या बाबत सांगताना लसीकरण मोहिमेचे समन्वयक संजय कदम म्हणाले की, शासकीय रुग्णालयाअंतर्गत एका लसीकरण केंद्रावरून एका दिवसाला चारशे व्यक्तींना लस टोचण्याची व्यवस्था केलेली आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या सर्व केंद्रांवरून नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. याशिवाय सर्वात आधी वयोवृद्ध नागरिकांना लस दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
खासगीत अडीचशे रुपयांना एक डोस -
शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस मोफतदेण्यात येणार आहे. मात्र, जर खाजगी रुग्णालयात आपण लस घेत असाल तर शंभर रुपये रजिस्ट्रेशन शुल्क आणि दीडशे रुपये लसीकरण चार्ज म्हणजेच खाजगी रुग्णालयात एकूण अडीचशे रुपयांना कोरोना लसीचा डोस नागरिकांना मिळणार आहे.