बीड - देशात 'लॉकडाऊन' केल्यामुळे तीर्थयात्रा व भागवत कथेला गेलेले बीडच्या परळी शहरातील 90 महिला-पुरुष भाविक वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे अडकले आहेत. रेल्वे रद्द झाल्याने या भाविकांवर मथुरा वृंदावनमध्येच धर्मशाळेत अडकून पडण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील त्या भाविकांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून आमच्या नातेवाईकांना परत परळीत आणण्याबाबत विनंती केली आहे.
देशात 22 मार्चला जनता कर्फ्यू व त्यानंतर लॉक डाऊन केल्याने 22 मार्चपासून रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. यामुळे या 90 जणांना परळीकडे येता येत नाही, त्यामुळे 25 मार्चपासून त्यांचे जेवणाचे हाल सुरू झाले आहेत. कसेही करून आम्हाला परळी कडे येऊ द्या, अशी विनवणी वृंदावन येथे आश्रमात मुक्कामाला थांबलेले परळी व अन्य ठिकाणचे लोक करून लागले आहेत.