बीड -जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण फळ खरेदीसाठी सर्रास बाजारात फिरून येत असल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील वडवणी येथे समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील तीन कोविड सेंटरवर मिळून दीडशे रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना कोविड सेंटरवर उपचार घेणारे चार ते पाच रूग्ण हे विनामास्क बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील गाड्यांवर त्यांनी फळे खरेदी केली. शिवाय एका दुकानातून पाण्याच्या बाटल्याही आणल्या. खरेदी आटोपल्यावर हे रुग्ण बिनबोभाटपणे कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. हा खळबळजनक प्रकार घडल्यानंतरही प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
बेजबाबदारपणा.. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रूग्ण फळ खरेदीसाठी विनामास्क फिरतात बाहेर; पाहा व्हिडिओ
बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण फळ खरेदीसाठी सर्रास बाजारात फिरून येत असल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील वडवणी येथे समोर आला आहे.
वडवणी शहरात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आनंद मंगल कार्यालय व राजर्षि शाहू महाराज विद्यालय अशा तीन ठिकाणी कोविड सेंटर सुरु असून १५० पॉझिटिव्ह रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. या कोविड सेंटरवर प्रशासनाकडून खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याची तक्रार रूग्णांतून होत आहे. जेवण वेळेवर न मिळाल्याचे कारण देत आनंद मंगल कार्यालयातील तीन तर राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण विनामास्क बाहेर पडल्याचे सोमवार समोर आले. शहरातील शिवाजी चौक परिसरात जाऊन त्यांनी फळे खरेदी केली. याशिवाय बाटलीबंद पाणीही खरेदी केले. या सर्व प्रकारामुळे शहर व परिसरात एकच खळबळ उडालेली असून अशाने कोविडच्या भीषण संकटाला निमंत्रण मिळत आहे.
रुग्ण सांगूनही ऐकत नाहीत -
या प्रकाराबाबत विचारले असता वडवणी येथील कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. रविकांत चौधरी म्हणाले की, शहरातील कवडगाव रस्त्यावरील दोन कोविड सेंटरवरील रूग्ण हे त्याठिकाणी असलेल्या कर्मचारी, डॉक्टर व वॉर्डबॉय यांना घाबरत नाहीत. काही सांगितले की थेट अंगावर धावतात. त्यामुळे आम्ही वडवणी पोलीस ठाण्याला संरक्षण मिळण्यासाठी पत्र दिलेले आहे. मात्र, अद्याप पोलीस आले नाहीत. पोलीस कर्मचारी असतील तर रुग्ण बाहेर जाणार नाहीत, त्यांना घाबरतील. कंपाऊंडवरून उडी मारून हे रूग्ण बाहेर जात आहेत.
हा प्रकार चुकीचाच -
वडवणीतील कोविड सेंटरवरून काही रूग्ण हे बाहेर पडून फळ व साहित्य खरेदी करत असल्याची चर्चा होती. रविवारी हा प्रकार चित्रीकरणामुळे स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे जे रुग्ण बाहेर पडले होते त्यांनी मास्कही लावले नव्हते. अशाने रूग्ण वाढणार नाहीत तर काय होईल? असा प्रश्न व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष विनायक मुळे यांनी उपस्थित केला आहे.
तहसिलदार 'नॉट रिचेबल'-
वडवणी तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना तसेच कोविड सेंटरवरील रुग्ण बाहेर पडत असतानाही प्रशासनाला कुठलेही गांभीर्य नाही. या प्रकाराबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तहसिलदार वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनीही बंद होता.