महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत घट, संख्या ३ हजारावरून ७०० वर - Dr. Ashok Thorat Beed

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले आहे. आज घडीला केवळ ७०० अ‌ॅक्टिव्ह रुग्ण जिल्हाभरात उपचार घेत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Nov 3, 2020, 8:37 PM IST

बीड - जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तीन हजाराहून अधिक कोविडच्या रुग्णांची संख्या होती. परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले आहे. आज घडीला केवळ ७०० अ‌ॅक्टिव्ह रुग्ण जिल्हाभरात उपचार घेत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.

माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात

मागील आठ महिन्यापासून जिल्हा आरोग्य विभाग कोरोनाच्या संकटाला झुंज देत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोविडच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यात १३ हजार ५१० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये केवळ ७०७ रुग्ण बीड जिल्ह्यात उपचार घेत आहेत. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ३६५ एवढी आहे. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर ९१.५२ टक्के एवढा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

लोखंडी सावरगाव येथील ९०० खाटा कमी केल्या

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे १ हजार खाटांचे सर्वात मोठे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने लोखंडी सावरगाव येथील शासकीय कोविड रुग्णालयामधील ९०० खाटा कमी करण्यात आल्या असून केवळ १०० खाटाच कार्यान्वित ठेवलेल्या आहेत. रुग्ण संख्येत घट होत असल्याने कंत्राटी तत्वावर भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कामावरून कमी केले जात आहे. आतापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक कामगार व कर्मचारी कमी करण्यात आले आहेत.

आज घडीला तेराशे खाटांची व्यवस्था

बीड जिल्ह्यात पाच ते सहा हजार खाटा तयार केल्या होत्या. सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा पीक पिरेड होता. मात्र, आता रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. त्यामुळे, सध्या जरी सातशे रुग्ण अ‌ॅक्टिव्ह असले तरी अचानक रुग्ण संख्या वाढली तर त्यासाठी बीड जिल्ह्यात एकूण १ हजार ३०० खाटांची व्यवस्था सज्ज असल्याचे डॉ. थोरात म्हणाले.

हेही वाचा-लेझीम अन् डफडे वाजवणारे आमदार धस रमले कुस्तीच्या फडात..

ABOUT THE AUTHOR

...view details