बीड- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई विभाग हा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा हॉटस्पॉट बनला आहे, अशी टीका अनेकवेळा होत आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांना बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर मिळावे यासाठी स्थानिक प्रशासन आणि आमदार संजय दौंड सातत्याने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
आशिया खंडातील पहिल्या पाच रुग्णालयामध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा समावेश होते. रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, पीएमकेअर सेंटरकडून आम्हाला मिळालेले व्हेंटिलेटर खराब निघाल्याने आमच्या आडचणीमध्ये आणखी वाढ झाली.
ऑक्सिजनसाठी दौंड यांचा पाठपुरावा
मागील पंधरवाड्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे, ऑक्सिजनची कमतरता आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये झालेली वाढ यामुळे चर्चेत आले होते. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन कोरोनाची बिकट परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. यामध्ये आ. संजय दौंड यांनी ऑक्सिजन मिळवण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून, ऑक्सिजनची उपलब्धता करून दिली. संजय दौंड हे नेहमीच कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी हजर आहेत, त्यांनी कोरोनाकाळत त्यांची स्वतःची एक टीम बनवली असून ती ग्रामीण भागात सेवा देत आहे. तसेच दौंड यांच्या प्रयत्नातून अनेकांना आतापर्यंत ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता झाली आहे.