बीड - राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूची धास्ती निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय बीडच्या बाजारपेठेत येत आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. तसेच, प्रशासन आणि सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन येथील खरेदी-विक्री चक्क 50 टक्क्यांनी घटली असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने लोकांनी बाजारासारख्या गर्दीच्या ठिकाणी जाणे कमी केले आहे. शिवाय, बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क आहे. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम आता जाणवू लागला आहे. शहरातील सुभाष रोड या बाजार पेठेतील मुख्य मार्गावर शनिवारी शुकशुकाट पाहायला मिळतोय. यामुळे खरेदी-विक्री घटली असल्याचे बीडमधील व्यापाऱ्यांनी सांगितले. सोन्या-चांदीच्या बाजारातही 50 टक्क्यांनी मंदी आल्याचे अखिल भारतीय सोनार समाज युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश लोळगे म्हणाले. याशिवाय कापड बाजारही 45 टक्क्यांनी घसरल्याचे कापड व्यापारी राजेश मोजकर यांनी सांगितले.