बीड - गणेशोत्सवावर यावर्षी कोरोनाचे संकट कायम राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने मूर्तिकारांकडून लाखो रुपये गुंतवून विघ्नहर्ताच्या मूर्त्या तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप एकाही गणेश मंडळाकडून आम्हाला गणेश मूर्तीसाठी ऑर्डर आलेली नसल्याची खंत बीड येथील गणेशमूर्तीकार राहुल काळे यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच यंदा आम्ही खासगी सावकाराकडून 8 ते 9 लाख रुपयांचे कर्ज घेऊन कच्चा माल खरेदी करून ठेवला होता. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत आम्ही लाखो रुपयांचे भांडवल गुंतवून ठेवलेय. आता याचे काय होईल कोणास ठाऊक, अशी कैफियत बीड येथील मूर्तिकार राहुल काळे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना मांडली आहे.
लाखोंचे कर्ज डोक्यावर.. बीडमधील गणेशमूर्ती व्यावसायिक राहुल काळे यांची कैफियत... हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे तरुण पिढी नैराश्याच्या सावटाखाली; संवाद-मेडिटेशनचा हवा आधार
राज्यात कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यावर बंधने आली आहेत. अशा बिकट परिस्थितीत लाखो रुपये गुंतवून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारकरांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यातील मूर्तिकार राहुल काळे यांच्याकडे 4 ते 5 गोदाम भरून गणेश मुर्ती तयार आहेत. दर वर्षी 19 ते 20 लाख रुपयांचा व्यवसाय मूर्तिकार राहुल काळे करतात. जुलै महिन्यापासून वेगवेगळ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या ऑर्डर मूर्तिकार राहुल काळे यांना मिळत असतात. तीन फुट उंचीच्या गणेश मूर्ती पासून ते दहा फुटाच्या गणेश मूर्ती पर्यंत ऑर्डर गणेश मंडळांकडून मिळत असते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे आत्तापर्यंत एकाही गणेश मंडळाकडून गणेश मूर्ती खरेदीसाठी ऑर्डर आलेली नसल्याचे मूर्तिकार राहुल काळे म्हणाले.
आता परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही...
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दरम्यान आम्ही मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चामाल खरेदी करून ठेवला होता. सुरुवातीच्या काळात कोरोनाचे संकट एवढा काळ टिकेल याचा अंदाज आलेला नव्हता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मूर्ती बनवण्याच्या कामाला लागलो. जसजसे दिवस पालटले तसतसे कोरोना चे संकट अधिकच गडद होत गेले. त्यातच फेब्रुवारी 2020 च्या सुरुवातीलाच कच्चा माल खरेदी करून ठेवलेला असल्याने आम्ही मूर्ती बनवण्याचे काम थांबवले नाही. याचाच परिणाम आता बनवलेल्या मूर्ती विक्री करणार कसे? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. असे सांगत पुढे राहुल काळे म्हणाले की, खासगी सावकाराकडून आठ ते नऊ लाख रुपये व्याजाने घेऊन या व्यवसायात गुंतलेले आहेत. आता उद्भवलेर्या परिस्थितीशी सामना करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. विघ्नहर्ताच आमच्यावरचे हे संकट दूर करेल, अशी आशा आहे, असे मत राहुल काळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -मुंबईत मागील दहा वर्षात एकही 'एन्काऊंटर' नाही... वाचा सविस्तर इतिहास