बीड-भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे. याशिवाय बहुतांश माहिती दडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आक्षेप घेतल्यावरूनच माझ्यावर जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसमोर पंकजा मुंडे व भाजपच्या गुंडांनी हल्ला केला, असा आरोप दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आहे.
प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे, असा आक्षेप घेतल्यावरून दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आज अर्ज छाननीच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तणाव पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हल्ला करून देखील पोलिसांनी मध्यस्थी केलीनाही. त्यामुळे प्रशासन कोणाची बाजू घेत आहे ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्हा प्रशासन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आता काय कारवाई करते यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा बीडमध्ये खून झाला होता. या प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर आरोप केला होता. आता पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याने विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.