बीड-खोटे बोलून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा उद्योग शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे हे अनेक दिवसापासून करत आहेत. आता तर मराठा आरक्षणाच्या नावावर जनतेला खोटे सांगून मोर्चा काढायचा प्रयत्न आमदार मेटे करत आहेत. सबंध महाराष्ट्राला माहीत आहे की, आमदार विनायक मेटे हे भाजपच्या प्रचारक समितीतील एक सदस्य आहेत आणि आरक्षणाचा विषय हा राज्याच्या कक्षेतला नसून आता तो विषय केंद्राकडे गेला आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. असे असतानाही केवळ राज्य सरकारवर स्वतःच्या स्वार्थासाठी टीका करायची हा उद्योग आमदार विनायक मेटे करत आहेत. असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी शुक्रवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, शहादेव हिंदोळे अॅडव्होकेट साळवे आदींची उपस्थिती होती. पाच जून रोजी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे हे बीडमधून मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा काढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच राज्यात बीडमध्ये मोर्चा निघत असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी बीडमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते लाखे म्हणाले की, मागील अनेक वर्षांमध्ये नेमलेले आयोग व मराठा आरक्षणाच्या संदर्भाने झालेल्या घडामोडींच्या तारखा लक्षात घेतल्या तर मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी केवळ भाजप जबाबदार आहे. असे असताना देखील केवळ विरोध करायचा म्हणून राज्य सरकारला विरोध केला जात आहे. असा आरोप लाखे यांनी यावेळी केला.