बीड- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना बीड जिल्ह्यात एक वर्षभरही काम करता आले नाही. अखेर मंगळवारी (दि. 19 जाने.) त्यांच्या जागी औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर. एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत. मात्र, रेखावार यांना अद्याप कोठेही नियुक्ती मिळालेली नसल्याने ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या बदलीची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरू होती. मात्र, मधल्या काळात संपूर्ण राज्यभरातच ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागली. या काळात रेखावार यांची बदली तात्पुरती थांबली होती. मात्र, आचारसंहिता शिथिल होताच रेखावार यांची वर्षभराच्या आतच बीडवरून बदली करण्यात आली आहे. मागील आठ-नऊ महिन्याच्या दरम्यान रेखावार यांच्या कार्यकाळात अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी विलंब लागलेला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या बिकट परिस्थितीत मध्यरात्री आदेश काढणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्यावर सातत्याने माध्यमांमधून टीका झालेली आहे.