बीड - बीड जिल्ह्यात यापूर्वी वाळू तस्करीसाठीच्या रेट कार्डने खळबळ माजविली होती. त्यापाठोपाठ आता चक्क एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतच 'वसुली' होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. थेट एसीबीचेच रेट कार्ड सामाजिक कार्यकर्ते बक्षु अमीर शेख यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या तक्रारीत एसीबीच्या मार्फत महिन्याला २४ लाखाची वसुली होत असल्याचा दावा करण्यात आला. त्यात एसीबीच्या यापूर्वीच्या उपअधीक्षकांसह विद्यमान पोलीस निरीक्षकांवर आरोप करण्यात आले आहे.
जिल्ह्यात लाचखोरी आणि टक्केवारीची चर्चा नेहमीच होत असते. यापूर्वी जिल्ह्यात वाळू तस्करीसाठी कोणाला किती लाच द्यावी, याचे एक रेटकार्डच वाळू वाहतूकदारांनी जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. आता यापुढचे टोक समोर येत आहे. मागच्या काही वर्षात बीड जिल्ह्यात एसीबीने कारवाई न करण्यासाठी 'वसुली' केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते बक्षु अमीर शेख यांना टपालाने यासंदर्भात एक माहिती मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात एसीबीकडून महिन्याला २४ लाखाची वसुली करण्यात येत असून यात तत्कालीन उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे आणि सध्याचे पोलीस निरीक्षक म्हणून एसीबीतच कार्यरत असलेले रवींद्र परदेशी यांच्यावर या वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत.
तत्कालीन उपअधीक्षकांविरुद्ध आरोप -
सदर तक्रार यापूर्वीच गृहमंत्र्यांना करण्यात आली होती. यात तत्कालीन उपअधीक्षक आणि विद्यमान एसीबी बीडच्या निरीक्षकांवर आरोप करण्यात आले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मालमत्तांचा देखील उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरटीओवर एकही कारवाई नाही -