बीड- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. मजुरांच्या हाताला काम नाही, अशा बिकट परिस्थितीत गोरगरीब स्वस्त धान्यावरच अवलंबून आहेत. बीडमध्ये एका कुटुंबाने स्वस्त धान्य मागितले म्हणून त्याला दुकानदार मालकाकडून मारहाण झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील नांदगाव येथे घडली.
रेशन मागितले म्हणून दांड्याने मारहाण; गेवराई तालुक्यातील नांदगाव येथील घटना
बीडमध्ये एका कुटुंबाने स्वस्त धान्य मागितले म्हणून त्याला दुकानदार मालकाकडून मारहाण झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील नांदगाव येथे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की गेल्या चार दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदार सुनील राऊत यांच्याकडे रेशनची मागणी होत होती. अनेक वेळा चकरा मारूनदेखील रेशन न मिळाल्याने विष्णू गाडे, प्रभू गाडे या दोन भावंडांनी जाब विचारला असता स्वस्त धान्य दुकानदाराकडून चक्क काठीने मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
यावेळी दुकानदाराचे कुटुंब आणि या दोघांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी झाली. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधित दुकानदाराचे स्वस्त धान्य दुकान निलंबित केले असून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव यांनी दिली आहे.