बीड- जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायत हद्दीतील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून थातूर-मातूर कामे करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षपाणाला कंटाळून ग्रामस्थांनी स्वतः चिखलात बसून आज आंदोलन केले. आता तरी प्रशासन सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देईल का? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
पाटोदा तालुक्यातील घोलप वस्ती ते हनुमान वस्ती या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना या खराब रस्त्यावर ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सखल भागात पाण्याची डबकी साचली आहेत. शाळेकरी मुले, वयोवृद्ध माणसे तसेच गरोदर माता भगिनी यांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.