बीड- राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या (Child sexual abuse) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. चक्क सोळा वर्षाच्या (अल्पवयीन) मुलीवर सहा महिन्यात चारशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केले असल्याची घटना समोर आल्याने बाल कल्याण समिती अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ.अभय वनवे यांनी चिंता व्यक्त करत 'ईटीव्ही भारत' शी बोलताना संगितले की, संबंधीत अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचे अनेकांनी अत्यंत क्रुरतेने शोषण केलेले आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यात चारशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केले आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असून संबंधित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्याची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Beed District Hospital) दाखल करण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याच्या सुचना आम्ही दिलेल्या असल्याचे डॉ. वनवे म्हणाले.
या प्रकरणातील मुलगी ही अल्पवयीन आहे. त्यामुळे हा गंभीर प्रकार असल्याचेही बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे. याबाबत बीड पोलिसांनी (Beed police) पुरवणी जबाब घेतला असून त्यामध्ये मुलीने म्हटले आहे की, चारशेहून अधिक व्यक्तींकडून माझ्यावर अत्याचार झालेला आहे. सहा महिने मी अत्यंत वाईट स्थितीत जगलेली आहे. या प्रकरणात अत्यंत वाईट बाब म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या जबाबात सांगितले आहे. अशी माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ. अभय वनवे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सध्या मुलगी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. सदरील अल्पवयीन मुलगी 20 आठवड्यांची गर्भवती असून तिला एमटीपी साठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचेही डॉक्टर वनवे म्हणाले.
पोलिसांनी दखल घेतली नाही -
सामाजिक कार्यकर्ते तथा बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसापूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात माहिती देताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे म्हणाले की, जिल्ह्यातील कुंबेफळ थेथील एका सोळा वर्षाच्या मुलीची ट्रॅझेडी अक्षरश: अंगावर शहारे आणणारी आहे. लहान असतानाच आईचे छत्र हारवले. सात-आठ महिन्यापूर्वी वडिलांनी अल्पवयातच लग्न लावून दिले. सासरी नवरा संभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे रहायला आली. परंतू वडिलांनी देखील तिला संभाळण्यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलील अंबाजोगाई येथील बसस्थानकांवर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले असल्याचे संबंधीत अल्पवयीन मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.