तत्त्वशील कांबळे, बाल हक्क कार्यकर्ता बीड : बीडच्या शिरूर तालुक्यातील भावी या गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीचा तीन वर्षांत तीन वेळा बालविवाह करण्यात आला.
पालकांसह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल : 22 डिसेंबर 2020 रोजी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला होता. त्यानंतर त्या मुलीचे तिच्या पतीसोबत वाद झाला. त्यानंतर ती मुलगी माहेरी आली. दोन वर्षानंतर 18 फेब्रुवारी 2022 रोजी तिचा सातारा जिल्ह्यात विवाह झाला. मात्र तिथेही पतीबरोबर व सासरच्या मंडळी बरोबर न पटल्यामुळे ती माहेरी परतली. त्यानंतर 7 जून 2023 तिचा पुन्हा शिरूर तालुक्यातील दहिवडी गावामध्ये विवाह लावण्यात आला. यावेळी मात्र पोलिसांना याची माहिती चाईल्ड लाईनद्वारे मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. या प्रकरणी पालकांसह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्याने आणले उघडकीस : या बालविवाहाची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व ग्रामसेविका यांनी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या आधी ही जे दोन बालविवाह झाले आहेत त्या संदर्भातही पालकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच जर त्या बालकाचे शारीरिक शोषण झाले असेल तर त्या संदर्भातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
नागरिकांना आवाहन : पोलिसांनी या प्रकरणी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कुठे बालविवाह होत असेल तर आपण प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा. 'बेटी बचाव - बेटी पढाव' या नाऱ्या अंतर्गत देशातील मुलींचे संरक्षण झाले पाहिजे. तसेच या मुलींचे शिक्षण व पुनर्वसन झाले पाहिजे. त्यासाठी प्रशासनासह अनेक एनजीओ देखील काम करत आहेत. विशेष म्हणजे, चालू वर्षांमध्ये जवळपास 100 ते 150 बालविवाह थांबविण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
- Child Marriage In Beed: बालविवाहाला बीड जिल्हा प्रशासनाचं पाठबळ आहे का? तक्रार देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ
- Child Marriage : मराठवाड्यात सर्वाधिक बालविवाह, मुलींचे वय 18 वरून 21 करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव