बीड :मराठवाड्यामध्ये सध्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच जोरदार तयारीसाठी भाजपकडून मोठी कसरत केली जात आहे. सर्वच नेते पदाधिकारी प्रचार कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडे यांना भाषण करण्यासाठी थांबवत स्वत: भाषण केल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे.
कसा घडला प्रकार : भाजपच्यावतीने बीड जिल्ह्यात उभे असलेले उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे यांचे भाषण संपले आणि पंकजा मुंडे यांना बोलण्यासाठी अनाउन्सींग करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे उठल्या आणि माईक पकडणार तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना थांबवत अगोदर मला बोलायचे आहे असे म्हटले. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषण सुरू केले. मी अगोदर बोलणार असे म्हटल्यामुळे पंकजा मुंडे यांना चक्क खाली बसावे लागले. हा प्रकार गेवराई येथे घडला. त्यानंतर पुन्हा दुसरा कार्यक्रम बीड येथे सुरू असताना असाच प्रकार घडला.