बीड :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये शरद पवार यांचे जंगी स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडखोरीनंतर बीडमध्ये शरद पवार यांची ही पहिलीच सभा आहे. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर नाव न घेता टीका केली आहे. सत्तेच्या मागे जा, पण माणुसकी विसरू नका, असा हल्लाबोल शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांवर केला आहे.
मोदींना महिलांचे दुःख कळत नाही का : शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणात की, मी पुन्हा येणार पण मुख्यमंत्री म्हणून नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पुन्हा येणार असल्याचे सांगत आहेत. मणिपूर, नागालँडसारखी महत्त्वाची राज्ये चीन, पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. तेथून देशावर कधीही संकट येऊ शकते. मात्र केंद्र सरकारला अजिबात देशाची काळजी नाही. मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिलासा देण्याची गरज होती. मात्र मोदींनी तिकडे जायची तसदीही घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिलांचे दुःख कळत नाही का?, असा सवाल देखील शरद पवार यांनी उपस्थित केला.
विरोधी सरकार पाडण्याचे भाजपाचे उद्योग :विरोधकांची सरकार पाडण्याचे उद्योग केंद्राने सुरू केले आहेत. विरोधी पक्षांच्या सरकारला अडचणीत आणण्याचे काम भाजपा करीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे. केंद्रातील मोदी सरकार सत्तेचा वापर करून सर्वसामान्यांचे सरकार पाडण्याचे काम करीत असल्याचा प्रहारदेखील पवारांनी मोदींवर केला आहे. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश भाजपाने सरकार पाडले. एकीकडे भाजपा स्थिर सरकार देण्याचे अवाहन करते आहे. मात्र, दुसरीकडे विरोधकांचे सरकार पाडण्याचे काम सुरू आहे. ही भाजपाची अतिशय वाईट चाल असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.