बीड :जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातून बालविवाहचे प्रकरण समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदागौळ येथे आज सकाळी बालविवाह होणार होता. याची माहिती चाईल्डला मिळाली होती. परंतु पथक पोहोचण्याअगोदरच लग्न लावण्यात आले होते. त्यानंतर ग्रामसेवकासह पोलिसांनी सर्व पंचनामा करून नवरदेव दोन्ही कडील नातेवाईक फोटोग्राफर, मंडपवाला, भटजीसह जवळपास 200 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या लग्नानंतर गावातील सर्वच लोक पळून गेले.
नातेवाईक घटनास्थळावरून फरार :परळी तालुक्यातील नंदागौळ येथील आदिनाथ गोविंद गीते (वय 24) याचा विवाह आंबेजोगाई तालुक्यातील चोपनवाडी येथील 16 वर्षीय मुलीसोबत रविवारी 11 वाजता नियोजित होता. दरम्यान, ही माहिती चाईल्ड लाईनला 1098 क्रमांकावर मिळाली होती. चाईल्ड लाईनचे संतोष रेपे यांनी ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांना माहिती दिली. या सर्वांनी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास भेट दिली असता त्या ठिकाणी लग्नाचे सर्व साहित्य आढळून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, या अगोदरच लग्न लावून वधू वरासह सर्व नातेवाईक घटनास्थळावरून पसार झाले होते.