बीड- कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र, शनिवारी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने आरक्षणप्रश्नी हजारोंच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. कोरोना अधिनियमासह साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह २१ प्रमुख पदाधिकारी व तीन हजार आंदोलकांवर रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटलांसह तीन हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल - बीड मराठा आंदोलन
निवारी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने आरक्षणप्रश्नी हजारोंच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. कोरोना अधिनियमासह साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह २१ प्रमुख पदाधिकारी व तीन हजार आंदोलकांवर रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आमदार विनायक मेटे यांनी राज्यात पहिला मोर्चा बीडमध्ये काढण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले होते. त्यात मोर्चा, आंदोलनालाही परवानगी नव्हती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिली नव्हती. संयोजक मात्र मोर्चावर ठाम राहिले. शनिवारी हजारोंच्या संख्येचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. फिर्याद नोंदविण्यावरुन रात्री उशिरापर्यंत पोलीस व महसूल प्रशासनात खल सुरु होता. अखेर मंडळाधिकारी अतुल झेंड यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून गर्दी जमवत आंदोलन केल्याची तक्रार शहर ठाण्यात दिली. त्यावरुन आमदार विनायक मेटे, माजी आमदार तथा आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, राजन गात, योगेश शेळके, रमेश पोकळे, सुधीर काकडे, स्वप्नील गलधर, दत्ता गायकवाड, अनिल घुमरे, गणेश मोरे, ज्ञानेश्वर कोकाटे, बबन माने, नितीन आगवान, अशोक सुखवसे, मनोज जरांगे, अक्षय माने, शेषराव तांबे, राजेंद्र आमटे, राजेंद्र बहिर, युवराज मस्के, नंदकुमार सावंत यांच्यासह इतर २ हजार ७०० ते तीन हजार आंदोलकांवर कलम १८८, २६९,२७० भादंवि कलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सह कलम २,३,४ साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रवि सानप हे करत आहेत.