बीड- अहमदनगर येथे बांधकाम कामगार म्हणून काम करत असलेल्या परळीचे 5 जण थेट नगरहून दोन दिवसांपूर्वी पायी गावाकडे निघाले होते. बीड येथे रविवारी आल्यानंतर शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी त्या पाचही जणांना थांबवून ठेवले आणि आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले. आरोग्य विभागाने त्या पाचही जणांना निगराणीखाली ठेवले आहे. संबंधित पाचही कामगार बीड जिल्ह्यातील परळी येथील आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीद चाऊस यांनी माणुसकी दाखवत त्या पाचही कामगारांची पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. यावेळी बीड पोलिसांनी देखील त्या पाचही कामगारांना समजावून सांगत आधार दिला.
सध्या सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जे कामगार जिल्ह्याबाहेर अडकलेले आहेत, त्यांना जेवणाच्या बाबतीत अडचणी निर्माण होत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथील 5 बांधकाम कामगार नगरहून दोन दिवसापूर्वी आपल्या गावाकडे म्हणजे परळीला चालत निघाले होते. रविवारी बीड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर बीड पोलिसांनी त्यांना हटकले. यावेळी आम्ही कामगार आहोत व परळीला चालत निघालो आहोत वाहनाची व्यवस्था नाही, असे उत्तर त्या बांधकाम कामगारांनी देताच बीड पोलिसांनी संबंधित आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्या पाचही जणांना तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयाकडे पाठवले. काही तास निगराणी नंतर त्या पाचही जणांना परळीला पोहोचवले जाणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.