महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानेच मागितली लाच; बीड येथील प्रकार - 'एसीबी'च्या अधिकाऱ्यानेच मागितली २ लाखांची लाच

गेवराई तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता शेख समद नूर मोहम्मद (५७) यास एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. बीडच्या 'एसीबी' पथकाने ५ एप्रिल २०२१ रोजी ही कारवाई केली होती. दरम्यान, याचा तपास 'एसीबी'चे सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी याने चिठ्ठीवर दोन लाख रुपयांचा आकडा लिहून लाच मागितली.

bribe was demanded by an official of the Bribery Prevention Department
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानेच मागितली लाच

By

Published : Jun 15, 2021, 8:13 AM IST

बीड - लाच घेताना पकडलेल्या शाखा अभियंत्यास गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याच सहायक निरीक्षकासह अंमलदाराने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी येथे उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक रात्री आठ वाजता बीडमध्ये धडकले.

'एसीबी'च्या अधिकाऱ्यानेच मागितली २ लाखांची लाच -

गेवराई तालुक्यातील एका गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रकावर तांत्रिक मान्यता देण्यासाठी पंचायत समितीतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता शेख समद नूर मोहम्मद (५७) यास एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. बीडच्या 'एसीबी' पथकाने ५ एप्रिल २०२१ रोजी ही कारवाई केली होती. दरम्यान, याचा तपास 'एसीबी'चे सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी याने चिठ्ठीवर दोन लाख रुपयांचा आकडा लिहून लाच मागितली. तर त्याचा लेखणीक अंमलदार प्रदीप वीर याने ५० हजार रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार शेख समद नूर यांचे बंधू जमीलोद्दीन शेख यांनी 'एसीबी'च्या अपर पोलीस महासंचालकांसह औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 'एसीबी'च्या अपर महासंचालक कार्यालयाने चौकशी केली होती, त्यात सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी व अंमलदार प्रदीप वीर या दोघांनाही दोषी ठरविण्यात आले होते. पाडवीची पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे तडकाफडकी बदली केली होती तर प्रदीप वीर यास 'एसीबी'तून कार्यमुक्त करुन जिल्हा पोलीस दलात परत पाठविले होते. दरम्यान, लाच घेताना पकडलेल्या आरोपीकडेच लाच मागितल्याच्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

अपर अधीक्षक तळ ठोकून-

दरम्यान, या प्रकरणात लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने जमीलोद्दीन शेख यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी व अंमलदार प्रदीप वीर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी रात्री उशीरा औरंगाबाद येथील 'एसीबी'चे प्रभारी अपर पोलीस महासंचालक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक विकास घनवट, अंमलदार राजेंद्र जोशी व मिलिंद इप्पर हे बीडमध्ये पोहोचले. ते शहर ठाण्यात तळ ठोकून होते.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष - बीडचे कोटेचा दाम्पत्य बनले कोरोना रुग्णांसाठी देवदूत

ABOUT THE AUTHOR

...view details