बीड- जमीन विकून आलेले पैसे मला का देत नाहीस, म्हणत चक्क जन्मदात्या आईलाच दगडाने ठेचून मारल्याची घटना शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) घडली असून शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली आहे. मदन पांडुरंग मानगिरे, असे आरोपी मुलाचे नाव आहे तर प्रयागाबाई पांडुरंग मानगिरे (वय 60 वर्षे, रा. चौसाळा, ता. बीड), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेले सविस्त वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी प्रयागाबाई यांनी तीन एकर जमीन विकली होती. त्याचे आलेले पैसै मला देत का नाहीस म्हणत मदन अनेक दिवसांपासून आईशी भांडत होता. अखेर शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) रात्री मदन दारु पिऊन आला व पैशासाठी भांडण काढून आईला मारू लागला. हे भांडण वाढत गेले व मदनने आईच्या डोक्यात दगड मारला. डोक्यात जोराचा घाव बसल्याने प्रयागाबाई यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली होती, मात्र मदनने ही बाब कुणाला सांगितली नाही. शनिवारी सकाळी प्रयागबाई उठल्या नसल्याने शेजारच्यांनी घरात पाहिल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला.