बीड :पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना बीडमध्ये समोर आली आहे. शहरात मागून खाणाऱ्या अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुकलीला, खाऊचे अमिश दाखवून उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरातील क्रीडांगणाच्या परिसरात असणाऱ्या शौचालयामध्ये रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावर रक्ताचे डाग देखील आढळून आले आहेत. बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनेने आणखी त्यात भर पडली आहे.
खाऊच आमिष दाखवून केला अत्याचार :प्राथमिक माहितीवरून 3 ते 4 नराधमांनी त्या चिमुकल्या मुलीला खाऊच आमिष दाखवून या क्रीडांगणाच्या शौचालयाच्या परिसरात नेल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पीडित मुलगी ज्या वेळेस मोठमोठ्याने ओरडायला लागली. त्यानंतर हा सर्व प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्या ठिकाणाहून नराधम अज्ञातांनी तिथून धूम ठोकली. या घटनेची माहिती कळताच, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम घटनाथळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत, पीडित चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पीडित चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आज पहाटे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात आरोपीवर कलम 376, पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.