परळी वैजनाथ(बीड) - गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वसुलीला सामोरे जावे लागत आहे. वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परळीतील विजपुरवठा सुरळीत करून सक्तीची वसुली थांबवा; भाजयुमोची मागणी
परळीत खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वसुलीला सामोरे जावे लागत आहे. वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
काय आहे निवेदनात -
याबाबत परळी वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता आंबडकर व देशमुख मॅडम यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांना विजेच्या बाबतीत सर्व दृष्टीने कुचंबणा सहन करावी लागत आहे. याबाबत तात्काळ अखंडित वीज पुरवठा करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजयुमो चे प्रदेश सचिव अॅड.अरुण पाठक,अनिष अग्रवाल, योगेश पांडकर, प्रल्हाद सुरवसे, वैजनाथ रेकने, गोविंद चौरे, दिपक गित्ते, सुनील मस्के, बाळू फुले, शाम गित्ते व भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्राहकांच्या वीजबिल संदर्भात समस्या मांडल्या -
भाजयुमोच्या वतीने निवेदन सादर करण्यात येत असताना अनेक नागरिकही आपल्या समस्या घेऊन कार्यालयात आले होते. त्या नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. भाजयुमो कार्यकर्त्यांनी यावेळी अनेक ग्राहकांच्या वीजबिल संदर्भात समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
हेही वाचा -रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील घराडा कंपनीत स्फोट; चार जणांचा मृत्यू