मुंबई- अरबी समुद्राला सिंधुसागर नाव सार्थ असल्याचे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर आता भाजपकडून या विधानाचे समर्थन केले जात आहे. राज्यात अरबी समुद्राच्या नामकरण चर्चेला यावरुन सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.
सिंधू नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक व अध्यात्मिक परिमाण आहेत. भौगोलिक परिस्थिती नेहमी बदलत असते त्यामुळे सिंधू नदी पुनश्च भारताचा भाग आहे, असा आशावाद जागविताना मुंबईतील अरबी समुद्राला वास्तविक सिंधुसागर हेच नाव सार्थ आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले होते. भाजपने या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. तर अरबी समुद्रापेक्षा सिंधू नदी आपल्या जवळ आहे. त्यामुळे सिंधू नदीचे नाव देणे उचित ठरेल, असे मत रिव्हर फाउंडेशनने व्यक्त केले आहे.
सिंधू नदी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची नदी मानले जाते. अरब देश आपल्यापासून खूपच दूर आहे. सिंधू नदी ही आपल्या सगळ्यात जवळची नदी आहे. तिचे उगम भारतात झाले असून ती सर्वात महत्त्वाची नदी म्हणून गणली जाते. त्यामुळे अरबी समुद्रपेक्षा सिंधू नदी म्हणणे आपल्या भारतीयांसाठी उपयुक्त असेल, असे मत रिव्हर फाउंडेशनचे विक्रम पवार यांनी 'ईटिव्ही भारत'कडे मांडले. राज्यपालांनाही हाच मुद्दा प्रकर्षाने मांडायचा असावा. भौगलिकदृष्ट्या या संदर्भात अभ्यास करायचा झाल्यास अधिक माहिती मिळेल. मात्र, अरबी समुद्रापेक्षा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सिंधु नदीमुळे सिंधुसागर म्हणणे, उचित ठरेल असे, पवार म्हणाले.