बीड- शहरात चार दिवसांपूर्वी एका महिलेला अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत. वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून बीड महिला भाजपच्या पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात महिलांनी श्राद्ध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
या सरकारच्या काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. प्रशासनाबरोबरच सरकारचा देखील हा नाकर्तेपणा आहे, असे सांगत या सरकारचे श्राद्ध आंदोलक महिलांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घातले.
अशी घडली होती घटना
बीड शहरात एकाच कुटुंबातील तीन महिलांना शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने जबरदस्त मारहाण केली होती. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, यातील आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिसांनी तत्काळ त्या आरोपी अटक करून मारहाण झालेल्या त्या महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी भाजपच्या आंदोलक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. संगीता धसे यांनी सांगितले.
हेही वाचा -ऑनलाइन मेळावा प्रकरण: कोविड प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत पंकजा मुंडेंवर गुन्हा दाखल