बीड - गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ( MP Chief Minister Shivraj Singh Chouhan ) यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde ) यांनी दाखवलेल्या मार्गाने ओबीसी प्रश्न सोडवता येऊ शकतो, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना दिला. तर माझी चिंता करू नका, मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची ताकद मला मुंडे साहेबांनी दिली आहे, असे वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
'गोपीनाथ मुंडे यांचे विचार महत्वाचे' :गोपीनाथ गडावर आलेल्या मुंडे समर्थकांसह नागरिकांना संबोधित करत असताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची आठवण करून दिली. आजचा दिवस चांगला नाही, काळा सूर्य घेऊन आलेला दिवस आहे. गोपीनाथ मुंडे गोरगरीबांचे होते. उस तोड कामगार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांनी केला. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. त्यामुळे मला कोणाचे मन तोडणे जमले नाही. माझी चिंता करू नका, मला माझी चिंता नाही. मिळालेल्या संधीचे सोन करणे ही मुंडे साहेबांची शिकवण माझ्याकडे आहे. माझा हट्टहास फक्त त्यांची शिकवण आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तर शिवराजसिंह चौहान चांगले काम करत आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षाचा प्रश्न सोडवला. महाराष्ट्र सरकारने प्रेरणा घ्यावी, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.