बीड -जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. परिषदेतील सत्ता अबाधित राखण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडेंनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मंगळवारी जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीला शिवसेनेच्या सदस्यांनीही हजेरी लावली.
हेही वाचा -शिवस्मारक घोटाळ्यातून जनभावनांशी खेळणाऱ्या भाजपचा अनैतिक चेहरा उघड; सचिन सावंतांची टीका
बीड जिल्हा परिषदेवर सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र ही सत्ता शिवसेना, काँग्रेसच्या पाठिंब्यावर आहे. पावणे 3 वर्षांपूर्वी भाजपने सत्ता स्थापनेसाठी शिवसंग्रामचा देखील पाठिंबा घेतला होता. मात्र, त्यानंतर पंकजांनी शिवसंग्रामचे चारही सदस्य फोडून त्यांना भाजपमध्ये घेतले.
मंगळवारी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी आपल्या समर्थक जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली, या बैठकीला शिवसेनेचे सदस्य देखील उपस्थित होते, त्यामुळे शिवसेनेसोबत असेपर्यंत भाजपच्या जिल्हा परिषदेतील सत्तेला धोका नसल्याचे स्पष्ट आहे.
मी देईल तो उमेदवार -
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे. सारिका डोईफोडे, डॉ. योगिनी थोरात यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी गटबाजीचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी या बैठकीत 'मी देईल तो उमेदवार मान्य आहे का ?' 'एकजुटीने राहणार का? ' असे प्रश्न उपस्थित सदस्यांना विचारले. अर्थातच यावेळी सर्वांनी एकसुरात 'हो' म्हटले. असे असले तरी प्रत्येकाने आपापली जमवाजमव सुरू केली आहे.
हेही वाचा -इथं ओरडण्यापेक्षा केंद्रात जाऊन ओरडा, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला