महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CA Bhavya Paleja : आई वडिलांच्या खांद्यावर बसून शिक्षण पूर्ण करणाऱ्या, भव्य पलेजाने उत्तीर्ण केली 'सीए' ची परीक्षा - भव्य पालेजा बनला सनदी लेखापाल

परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रचंड जिद्द आणि सातत्य या गुणांच्या जोरावर, येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करुन आपण आपले ध्येय गाठू शकतो. याचे उत्कृष्ट उदाहरण अमरावतीच्या भव्य पालेजा या युवकाने सीए (सनदी लेखापाल) हे पद गाठून सगळ्यांपुढे सादर केले आहे. जाणुन घेऊया भव्यचा जीवनप्रवास.

CA Bhavya Paleja
भव्य पालेजा

By

Published : Jan 14, 2023, 3:29 PM IST

प्रतिक्रिया देतांना भव्य पालेजा आणि पालक

अमरावती : जन्मतः असलेले अपंगत्व आणि अशा परिस्थितीत आई-वडिलांच्या खांद्यावर बसून शालेय शिक्षणासह महाविद्यालयीन शिक्षण घेणारा भव्य पालेजा या युवकाने सीए ची (सनदी लेखापाल) परीक्षा पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण करून; सीए होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. त्याच्या ह्या यशामुळे त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता त्याला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक देखील आपण भव्यचे शिक्षक आहोत, हे मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगत आहेत.


जीवनाची पदोपदी धडपड :जन्मतः स्पायनल मस्कुलर एन्ट्रोफी या आजारामुळे भव्य हा चालू शकत नाही. तसेच खुर्चीवर बसू देखील शकत नाही. त्याच्या कमरेला चक्क पट्टा लावून तो खुर्चीला बांधल्यावरच तो काहीसा व्यवस्थित बसू शकतो. जन्मापासूनच भव्य असा असला तरी, शहरातील गांधी चौक परिसरात प्रिंटिंग प्रेस चा व्यवसाय करणारे त्याचे वडील धर्मेंद्र आणि आई दीप्ती या दोघांनीही आपल्या मुलाला एक दिवस खूप मोठे करण्याचे स्वप्न बाळगून त्याचे संगोपन केले.

खडतर होता भव्यचा शैक्षणिक प्रवास :पहिली ते बारावी पर्यंतचे भव्यचे शिक्षण शहरातील मनीबाई गुजराती हायस्कूल येथे झाले. शाळेमध्ये चक्क त्याचे आई वडील त्याला उचलून नेत असत. भव्य ला शाळेतील बाकावर बसता देखील येत नव्हते. अशा परिस्थितीत त्याच्या आई वडिलांच्या मदतीने तो शाळेत कसाबसा बसायचा. दहावीत 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या भव्यने बारावीत देखील 90 टक्के गुण मिळवले होते. यानंतर बीकॉम आणि एम कॉम त्याने शहरातील विद्याभारती महाविद्यालयातून पूर्ण केले. हे शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना भव्य आणि त्याच्या आईवडिलांना करावा लागला.

पालकांच्या मेहनतीचे चीझ झाले : ज्या सर्व संकटांचा सामना या कुटुंबाने केला, त्याच्या आठवणी सांगताना भव्यच्या आई- वडिलांचे डोळे पाणावले. अनेकदा काही शिक्षकांकडून तिरस्काराची भावना व्यक्त केली जायची. मात्र आपण आपली जिद्द कायम ठेवून समोर जायचे, असा ठाम निर्णय भव्यच्या आई-वडिलांनी घेतला होता आणि आई- वडिलांचे हे प्रयत्न भव्यने सीए ही कठीण परीक्षा उत्तीर्ण करून सार्थ ठरविले.


आजारपणामुळे एक वर्ष झाला उशीर :अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत भव्य पलेजा या युवकाने 8 फेब्रुवारी 2019 मध्ये सीए इंटरमीडिएट ही परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तीन विषयात त्याला डिस्टिंगशनसह 248 गुण मिळाले. यानंतर भव्यने शहरातील मनीष मेहता यांच्याकडे इंटरनर शिफ्ट केली. सनदी लेखापाल आशिष अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात भव्यने आपले ध्येय गाठण्याचा ठाम निश्चय केला. 2021 मध्ये ऐन परीक्षे दरम्यान तब्येत बिघडल्याने परीक्षा देऊ शकलो नाही, असे भव्य पलेजा 'ई टीव्ही' भारतशी बोलताना म्हणाला. मात्र 2022 मध्ये ही परीक्षा आपण दिली आणि आता या परीक्षेचा निकाल 10 जानेवारीला समोर आला आणि माझ्यासह माझे संपूर्ण कुटुंब आज प्रचंड आनंदी झाल्याचे भव्य पलेजा म्हणतो. या परीक्षेदरम्यान मला लेखनिक म्हणून माझा मित्र आदेश शहा, सुफियान सुपारीवाला आणि ऐश्वर्या सिंगही यांची मदत मिळाली, असे देखील भव्य सांगतो. इतक्या सगळ्या प्रयत्नानंतर आज मी सनदी लेखापाल झालो आहे, याचा मला आनंद आहे, असे देखील भव्य पलेजाने 'ईटीव्ही भारत' शी बोलतांना नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details