बीड - ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांचा 2018-19 चा खरीप पिक विमा देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, विमा कंपनीचे अधिकारी गायब झाले. यानंतर शेतकऱ्यांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला. यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपली पिक विमा संदर्भातील कैफियत मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांना चांगलीच तंबी दिली असून, ''शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा'' अशा शब्दात रमा कंपनीच्या कर्मचार्यांना खडसावले आहे. या शिवाय प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयात तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धरमकर यांनी यावेळी दिल्या.
पिकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा; बीड जिल्हाधिकाऱ्यांची विमा कंपनीला तंबी - ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांचा 2018-19 चा खरीप पिक विमा देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.
2018-19 वर्षातील खरिपाचा पीक विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर गर्दी केली होती. विमा कंपनीकडून ओव्हर इन्शुरन्सचे कारण सांगितले जात आहे. असे असले तरी वर्षभरापूर्वी आमच्याकडून पीक विमा कंपनीने पैसे भरून घेतलेले आहेत. त्यामुळे आता जाणीवपूर्वक कंपनी थातूर मातूर कारणे सांगून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा पीक विमा हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव धारूर वडवणी या तीन तालुक्यातील 25000 शेतकऱ्यांचा पिक विमा कंपनीने दिला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. पीक विमा भरून घेतला त्याअर्थी आमचा मंजूर झालेला पीक विमा कंपनी का देत नाही? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांची कैफियत ऐकून जिल्हा अधिकारी प्रवीण धरमकर यांनी प्रत्येक तालुका स्तरावर कृषी कार्यालयात तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय कंपनीला देखील त्यांनी तंबी दिली आहे.