बीड - राज्याच्या राजकारणात झालेले बदल आणि यातून निश्चित केल्या जात असलेल्या भाजपच्या जबाबदाऱ्या, या सगळ्यांमध्ये पंकजा मुंडे कुठेच दिसत नाहीत. याचाच अर्थ राज्यस्तरावर भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहिलेले नाही. आता तर भाजपने हातातील सत्ताही गमावली आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे दबावतंत्र निर्माण करून पक्षाकडून मोठी जबाबदारी आणि पद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
रविवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टवरून त्यांना भाजपमध्ये चांगले दिवस नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत पंकजा मुंडे यांनी वापरलेला दबावतंत्राचा फंडा दिल्लीच्या नेतृत्वासमोर चालेल का? हे आज सांगता येणार नाही. मात्र, आजच्या परिस्थितीत देखील पंकजा मुंडे भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर बीड मधूनच होऊ लागला आहे.
हेही वाचा -राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढू- छगन भुजबळ
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीदेखील एकेकाळी भाजपमध्ये बंड केले होते. मात्र, त्यांनी पक्ष सोडला नाही. गोपीनाथ मुंडे काँग्रेसच्या दारापर्यंत जाऊन परत भाजपमध्ये आले होते. एवढेच नाही तर त्यांनी भाजपमध्ये आपले स्थान पक्के करण्याची किमयादेखील करून दाखवली होती. तो काळ आणि परिस्थिती वेगळी होती. तेव्हाच्या आणि आजच्या राजकीय परिस्थितीत मोठे फेरबदल झालेले आहेत. आज दिल्लीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चलती आहे. देशपातळीवर असो की, राज्य राज्यपातळी वरील असो, प्रत्येक निर्णय मोदी आणि शाह यांच्या सूचने वरूनच केले जातात. अशा राजकीय परिस्थितीत पंकजा मुंडे दबावतंत्र वापरून पहात आहेत.
पंकजा मुंडे या 12 डिसेंबर रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुक वर पोस्ट टाकल्यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. महाराष्ट्रातील व विशेषता देशपातळीवरील राजकीय परिस्थिती लक्षात घेता पंकजा मुंडे यांना आज तरी भाजप सोडणे परवडणारे नाही. कारण पंकजा मुंडे यांच्या छोट्या बहीण खा. प्रीतम मुंडे यांची खासदारकी देखील पंकजा मुंडे यांच्या भूमिकेमुळे धोक्यात येऊ शकते. राहिला प्रश्न नवीन पक्ष काढण्याचा अगोदरच राज्यात अगोदरच 'मायक्रो पार्टी' आणि त्या पक्षाचे नेते यांची संख्या मोठी आहे.
हेही वाचा -जनतेच्या विकासासाठी महात्मा फुलेंचा आसूड मंत्र्यांवर ओढा - बच्चू कडू
या सगळ्या परिस्थितीत नव्याने पक्ष काढून महाराष्ट्रभर या पक्षाची बांधणी करण्याचे मोठे आवाहन आहे. एवढे करूनही सत्तेत बसता येईल का? याची शाश्वती नाही. यातच जिल्ह्यातील वंजारा समाज आणि ऊसतोड मजुरांच्या जीवावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या मतदारावरील पंकजा मुंडे यांची पकड कमी झालेली आहे हे वास्तव पंकजा यांना मान्य करावे लागेल. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत घडलेले धनंजय मुंडे यांच्यासारखे सक्षम विरोधक पंकजा मुंडे यांना आहेत हे ही लक्षात ठेवावे लागेल व त्याप्रमाणे येणाऱ्या काळात भूमिका घ्यावी लागेल. असे मत राजकीय विश्लेषक स्पष्ट करताना पाहायला मिळत आहे.
राजकारणात जेव्हा-तेव्हा ची गरज लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी कारभारात करत असतात. सध्याची राजकीय परिस्थिती पंकजा यांच्यासाठी नाजूक आहे. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या सारखा सक्षम विरोधक आहे. आज स्थितीत पंकजा मुंडे यांची राजकीय स्थिती अत्यंत बिकट आहे. बीड जिल्ह्यातील वंजारा मतावर पंकजा यांची पकड राहिलेली नाही ही बाब नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी वरून स्पष्ट झालेले आहे. राहिला प्रश्न राज्यातील ओबीसी नेत्या म्हणून त्यांचा भविष्यात किती लाभ पक्षाला होईल. याचेही ठोस असे सांगणे आजघडीला अवघड आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांचे दबावतंत्र भाजप पक्षश्रेष्ठींवर किती प्रभाव पाडू शकेल, हे मात्र, येणारी वेळच सांगेल.