बीड - सध्या ऊसतोड मजूर, मुकादम यांचा संप सुरू आहे. जोपर्यंत ऊसतोड कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ऊसतोड मजूर कारखान्याला पाठविणार नाही, असा पवित्रा सर्वच ऊसतोड मजूर संघटनेने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी देखील या संपात उडी घेतली आहे.
हेही वाचा -'हाथरसच्या घटनेत उत्तर प्रदेश सरकारची भूमिका घृणास्पद'
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचा शब्द मोडल्याने बीडचे वंचितचे पदाधिकारी आक्रमक झाले. जिल्ह्यातील धारूर येथील घाटात काही मजूर कारखान्याला जात होते. तेव्हा वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांचा पारा चढला. आंबेडकर यांचा शब्द मोडल्याचे सांगत मजुरांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी समोर आली आहे.
यावेळी मजुरांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. मजुरांना मारहाण झाल्याने हा संप चिघळणार असल्याचे चिन्हे आहेत. कायद्याची भाषा करणारे प्रकाश आंबेडकर यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून कायदा हातात घेऊन मजुरांना अमानुष मारहाण केल्याची देखील चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा -सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत?