बीड Beed Tembhe Ganpati : गणेशोत्सवाच्या दहा दिवस गणपतीचा उत्साह महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात असतो. प्रत्येक शहर, गावातील ठिकाणी गणपतीची मंदिरं गजबजलेली दिसून येतात. गणेशोत्सवात अनेक सार्वजनिक मंडळं मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणपतीची स्थापना करतात. मात्र असं असलं तरी जवळपास ज्या दिवशी देशभरात गणपती बाप्पाची स्थापना होते, त्या दिवसापासून 5 दिवसानंतर बीड जिल्ह्यातील एका गणपतीची स्थापना होते. नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या गणपतीची ख्याती आहे.
काय आहे इतिहास : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील धोंडीराज टेंबे गणेश मंडळाची स्थापना निजामाच्या काळात 122 वर्षांपूर्वी झाली. या गणपतीची स्थापना आपल्या गणपतीच्या स्थापनेपासून जवळपास 5 दिवसानंतर होते त्यामुळेच या गणपतीचा इतिहासही रंजक आहे. निजाम कालीन राजवटीत 122 वर्षांपूर्वी या गणपतीच्या स्थापना मिरवणुकीस परवानगी नसल्यानं मिरवणूक अडविण्यात आली होती. त्यामुळं सदस्यांनी मिरवणूक अडविल्यानं त्याठिकाणाहून घोड्यावर हैदराबादला जात ताम्रपटावर स्थापनेची परवानगी आणली होती. यामुळं 5 दिवस गणपती त्याच ठिकाणी थांबविण्यात आला होता. यामुळंच मागील 122 वर्षांपासून या गणपतीची स्थापना 5 दिवस उशिराने म्हणजेच भाद्रपद एकादशीच्या दिवशी व विसर्जन चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला होते.