महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 23, 2019, 10:33 PM IST

ETV Bharat / state

बीडमधील वाळू प्रकरण: पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स मागविले, पोलीस अधीक्षकांचा दणका

बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी संबंधित वाळू प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स मागविले आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड

बीड -वाळू वाहतूकदार आणि जिल्हा प्रशासनातील महसूल व पोलीस अधिकाऱ्यांमधील वाद टोकाला गेला होता. या प्रकरणाची चौकशी देखील झाली होती. मात्र, त्या चौकशीतून फारसे काही हाती आले नव्हते. पण २ दिवसांपूर्वी नवनियुक्त पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पदभार स्वीकारताच वाळू प्रकरणात काळे हात झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे 'कॉल डिटेल्स' काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड

दीड महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील वाळू वाहतूकदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे एक निवेदन देऊन वाळू प्रकरणातील काळा बाजार चव्हाट्यावर आणला होता. कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता दिला जातो. याचा स्पष्ट उल्लेख त्या निवेदनात होता. मात्र, त्या निवेदनावर ठोस कारवाई करण्याऐवजी काही व्यक्तींना गुन्हे दाखल करण्याची भीती घालून प्रकरणे दाबली आहेत. या प्रकरणानंतर सर्वसामान्य नागरिकांना वाळू स्वस्तात मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजही ५ ते ६ ब्रास वाळूचे टिप्पर ३५ ते ४० हजार रुपयाला विकत घ्यावे लागते. ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात आहे. वाळू वाहतूकदार म्हणतात, की जर पोलीस विभागातील व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आम्हाला हप्ते मागितले नाही तर केवळ १४ ते १५ हजार रुपयात आम्ही वाळूची ट्रक नागरिकांना देऊ शकतो. संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे वाढलेले हप्ते, यामुळे वाळूची ट्रक महागले आहेत. दीड महिन्यापूर्वीच वाळू प्रकरणात झालेल्या थातूरमातूर कारवाईनंतर सर्वसामान्य माणसाचा काय फायदा झाला, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दोन दिवसापूर्वी नवनियुक्त पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एक बैठक घेतली. या बैठकीला काही अधिकाऱ्यांची गैरहजरी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र, नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांनी संबंधित वाळू प्रकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स मागविले असल्याने या प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांना योग्य भावात वाळू मिळू शकते, अशी अपेक्षा शासकीय घरकुल मिळालेले आणि बांधकाम करत असलेल्या नागरिकांची अपेक्षा आहे. पोद्दार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून बीड पोलिसांची प्रतिमा उजळण्याची संधी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना असल्याचे देखील बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details