बीड - राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळ्यादरम्यान उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्यासह शिवसैनिकांनी नायडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.
बीडमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या 'त्या' वक्तव्याबद्दल शिवसैनिक आक्रमक - udayan raje bhosale news
राज्यसभेत खासदारांच्या शपथविधी सोहळ्यात उदयनराजे भोसलेंनी शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत समज दिल्यामुळे त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी दिल्लीत पार पडला. यावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.
याबाबत बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ज्या पद्धतीने वर्तन केले आहे, त्यामुळे सबंध देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य हा महाराष्ट्र व शिवसेना कधीच खपवून घेणार नाही, असे नमूद केले आहे. यावेळी शिवसेनेच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली व व्यंकय्या नायडू यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह शिवसैनिक बाळासाहेब आंबूरे, किसान सेना प्रमुख परमेश्वर सातपुते, महिला संघटिका चंद्रकला बांगर, संगीता चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.